पंधरावे पीठाधीश
प. पू. स्वामी श्री मारोतीनाथ महाराज
(१८८२ - १९३०)
यांचे प्राकट्य अमरावती जिल्ह्यातील खोलापूर येथे कौंडिण्य गोत्रात खालकुनीकर घराण्यात झाले. व्यवसायाने हरदास असलेले हे कुटुंब पुढे उमरेड ग्रामी वास्तव्यास आले.
बाळ मारोतीस सद्गुरू श्रीभालचंद्रनाथांचे प्रथम दर्शन उमरेडला चैतन्येश्वर महादेव मंदिरात झाले.
यावेळी सद्गुरू श्रीभालचंद्रनाथ त्यांना म्हणाले की, तुमची एक ज्ञानधनाची ठेव आमच्याकडे आहे, ज्याची लोक वर्षानुवर्षे वाट पाहतात. पण त्याकरिता अंजनीग्रामला मठात यावे लागेल.
यानुसार पुढे त्यांचे मठात जाणे झाले, त्यांना अनुग्रह झाला आणि सद्गुरू सेवेचे अविरत व्रत त्यांनी स्वीकारले.
प. पू भालचंद्रनाथांचे निजधाम गमनानंतर इ.स. १९११ मध्ये सद्गुरू आज्ञेनुसार यांचा पट्टाभिषेक झाला.
यांच्या कारकिर्दीत यांनी मठाची अंतर्गत व्यवस्था, जमीन, शेती आदींचा कायदेशीर कारभार, मठाचे बांधकाम व विस्तार आदी महत्त्वाची कार्ये पार पाडली.
साधी राहणी, कृतिशील जीवन, प्रेम, सेवा, त्याग, शिस्त यांचा अंगीकार, सर्वांविषयी अनन्य जिव्हाळा आणि सर्वांच्या उद्धाराकरिता तळमळ मारोतीनाथांच्या ठायी दिसून येत असे.
भक्तिजागर, भजन, कीर्तन यांमधून अखंड सद्गुरुनिष्ठा आणि स्वतःची सोय-गैरसोय बाजूला ठेऊन सद्गुरू वचनांवर दृढ श्रद्धा आणि त्याद्वारे आत्मबोध प्राप्त करण्याचा उपदेश ते नेहमी देत असत. “विकल्प जाणावा तो महाप्रलय । तेणे श्रद्धा सद्भावाचा होई लय । अहंकार, मी पण नाचे थयथय । स्वहित कार्य हानी हो ।।” (श्री दे ली. ३३.३४)
इ.स. १९३० मध्ये अधिक आषाढ कृष्ण द्वादशीला महाराजांनी समाधी घेतली.