चौदावे पीठाधीश
प. पू. स्वामी श्री भालचंद्रनाथ महाराज
(१८७२ - १९११)
यांचे प्राकट्य वर्धा जिल्ह्यातील शिरपूर येथे इ.स. १८७२ रोजी देशमुख घराण्यात झाले.
कालांतराने त्यांना सद्गुरू श्रीरामकृष्णनाथ महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला.
पुढे प्रत्यक्ष भगवान श्रीगणेशाचे त्यांना दर्शन झाले व श्रीगणेशांच्या आज्ञेनुसार त्यांनी मोर्शी तालुक्यातील खेड येथील पुरातन गणेश मंदिरात आणि तदनंतर नील पर्वतावर जाऊन तपाचरण पूर्ण केले.
नील पर्वतावर सात वर्षे तपश्चर्या केल्यावर यांना भगवान श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले. दत्तकृपेने सकल शास्त्र, विद्या, कला यांचे ज्ञान श्रीमहाराजांना प्राप्त झाले.
अखंड भजन, कीर्तन, अगम्य ज्ञान, लीला लाघव, विविध राजे, सरदार , उमराव यांच्या शरणागती आदींनी यांची कारकीर्द समृद्धशाली होती.
सद्गुरू आज्ञेने भालचंद्रनाथांनी श्रीदेवनाथ महाराजांचे विस्तृत चरित्र लेखन केले.
इ.स. १९११ मध्ये पंढरपूर येथे श्रीविठ्ठल मंदिराजवळील चंद्रभागेच्या तटावर समाधी घेतली. आजही चंद्रभागेच्या तटावर पुंडलिक मंदिराजवळ भालचंद्रनाथांच्या नावाची पायरी आहे.