श्री जनार्दन स्वामी यांचे प्राकट्य फाल्गुन कृष्ण षष्ठी, शके १४२६ (इ.स. १५०५) ला चाळीसगाव, महाराष्ट्र येथे देशपांडे कुळात झाले. हे प्रत्यक्ष दत्तात्रयांचे अवतार होते.
पुर्वाश्रमी यांनी दौलताबाद येथील किल्ल्याचे किल्लेदार म्हणून भगवान दत्तात्रयांच्याच आज्ञेने तपश्चर्येसाठी ४१ वर्षे जबाबदारीचा सांभाळ केला.
मुळातच अध्यात्मिक वृत्ती असलेले स्वामीजी ध्यानाकरिता नित्य गडावरील गोरक्षगुहेमध्ये जात असततसेच दर गुरुवारी शूलभंजन पर्वतावर जाण्याचा त्यांचा नेम होता.
शके १४५७ मध्ये स्वामीजींना भगवान दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला आणि पुढील कार्याची आज्ञा झाली.
औदुंबर, नरसोबा वाडी, अंकलखोप यांसारख्या अनेक दत्तसंप्रदायातील तीर्थक्षेत्रांना यात्रा आणि तपस्या स्वामीजींनी केली. असे सांगितले जाते की, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष प्रगट होवून त्यांच्याकडून तपोसाधना करून घेतली.
भगवान दत्तात्रेयांनी यांना स्वस्वरूप प्रदान करून श्रीनाथ पीठ स्थापन करण्याची प्रेरणा दिली. त्यासोबतच प्रासादिक चिन्हे जसे छडी, कंठा, रुद्राक्षमाळ आणि झोळी देऊन श्रीदत्तात्रयांनी अत्री ऋषींच्या गृहस्थाश्रमी संप्रदायाची पीठोध्दार करण्याची आज्ञा केली.
आजही या प्रासादिक बाबी श्री देवनाथ मठात दर्शनगृहात दिसून येतात.
यांच्या विपुल अभंगरचना आणि ग्रंथरचना असून वेदान्तपर 'भावगीता' हा ग्रंथ प्रसिद्ध होय.
जनार्दन स्वामींचे शांतीब्रह्म एकनाथांसह (पैठण), जनी जनार्दन (बीड) रामा जनार्दन आदी विविध १२ सांप्रदायिक प्रमुख शिष्यांचे वर्णन प्राप्त होते.
मार्गशीर्ष वद्य एकादशी, शके १४९७ (इ.स १५७६) रोजी देवगिरी गडावरील गोरक्षगुहेमध्ये यांनी योगासमाधी घेतली.