परमपूज्य श्री श्री १००८ आचार्य स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज हे श्रीनाथ पीठाचे विद्यमान पीठाधीश असून, नाथ संप्रदायाच्या महान परंपरेतील अठरावे योगपट्टाधीश आहेत. श्रीनाथ पीठाची परंपरा सुमारे सहाशे वर्षांपासून अखंडितपणे सुरू असून, आदिनारायण-श्रीदत्तात्रेय-श्रीजनार्दनस्वामी-श्रीएकनाथ महाराज यांच्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे. आपल्या गुरुपरंपरेतून प्राप्त झालेल्या आध्यात्मिक आणि वैदिक ज्ञानाच्या आधारे, त्यांनी भारतीय संस्कृती, धर्मसंवर्धन आणि समाजकल्याणासाठी अनमोल योगदान दिले आहे.
परमपूज्य श्रीजितेंद्रनाथ महाराज यांना बालपणीच श्री श्री १००८ ब्रह्मानंद महर्षी स्वामी श्रीमनोहरनाथ महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त झाली. त्यांनी ऋग्वेद आणि अन्य वैदिक शिक्षण तसेच वेदांत आणि परंपरा प्राप्त ज्ञानाचा गाढा अभ्यास केला आहे.
श्रीगुरुजी विज्ञान, समाजशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र यामध्ये विद्याविभूषित असून, त्यांनी माहितीशास्त्र (Information Science) या विषयात विद्यापीठीय सुवर्णपदक मिळवले आहे.
इ.स. २००१ साली श्रीनाथपीठावर योगपट्टाभिषेक होऊन "स्वामी जितेंद्रनाथ गुरु मनोहरनाथ" या योगपट्ट नावाने त्यांनी पिठारोहण केले.
परमपूज्य श्रीजितेंद्रनाथ महाराज यांचे कार्य अत्यंत व्यापक असून, कथा, कीर्तन, प्रवचन, ज्ञानोपदेश, वैदिक शिक्षण, तपश्चर्या, भारतभ्रमण, जनसेवा, धर्मसंवर्धन आदी क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांनी संपूर्ण भारतभर लाखो भक्तगण आणि अनुयायांचा मोठा परिवार निर्माण केला आहे.
श्री देवनाथ वेद-विद्यालय, श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावास, विश्वमांगल्य सभा हे महिलांचे देशव्यापी संघटन,श्रीनाथ सखा साधक वृंद हे पुरुषांचे उपासना संघटन तसेच जगद्गुरू श्रीदेवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक सायन्स अँड रिसर्च ह्या सर्व उपक्रमांचे श्रीजितेंद्रनाथ महाराज प्रेरणास्थान व मार्गदर्शक आहेत. तसेच विविध धर्म परंपरांना सतत मार्गदर्शन, मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा याचसोबत सर्व जातिभेदांच्या बंधनांना झुगारून आध्यात्मिक उपासनेसह राष्ट्रभक्तीची दीक्षा श्रीजितेंद्रनाथ नित्य देत असतात.
श्रीदेवनाथ पीठ परंपरा ही संपूर्ण भारतवर्षात आणि परदेशात एक अत्यंत प्रतिष्ठित आणि बहुश्रुत परंपरा आहे. राष्ट्र आणि धर्म कार्यार्थ समर्पित या पवित्र परंपरेचे राजधानी असलेले सुरजी येथील श्रीदेवनाथ मठ हे या परंपरेचे मूलस्थान असून या परंपरेशी जोडलेली अनेक पवित्र स्थाने भारतात आणि परदेशात पसरलेली आहेत, जेथे प्रत्येक स्थानावर त्याची दिव्य उर्जा आणि आशीर्वाद अनुभवता येतो. देव, देश आणि धर्म च्या कल्याणार्थ अनेक उपक्रम आणि धार्मिक कार्य, या सर्व स्थानांवर, श्रीनाथ पीठाच्या विद्यमान पीठाधीशांच्या प्रेरणा आणि आशीर्वादाने निरंतर सुरु आहे.